मित्रहो सुमारे १०-१२ महिने लिखाणामध्ये खंड पडला होता. आता दसऱ्याच्या निमित्ताने काहीतरी लिहावे आला. काय लिहाव असा करतानाच समोर मालती दिसली आणि विचार आला ही तर धार्मिकदृष्ट्या खूप महत्वपूर्ण आहे पण तशी दुर्लक्षितच खरी !
शिवस्तुती मध्ये एक श्लोक आहे
कैलासराणा शिवचंद्रमौळी
फणींद्रमाथा मुकुटीं झळाळी
कारुण्यसिंधू भवदु:ख हारी
तुजविण शंभो मज कोण तारी ।। १ ।।
मंदार बिल्वें बकुलें सुवासी ।
माला पवित्र वहा शंकरासी ।
काशीपुरी भैरव विश्व तारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२६॥
जाई जुई चंपक पुष्पजाती ।
शोभे गळा मालती माळ हातीं ।
प्रतापसूर्य शरचापधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
या शिवस्तुती मध्ये मालती चे वर्णन येते. शंकराच्या कडे मालतीची माळ आहे असे म्हटले आहे.
अजून एक पद आहे
" जाई जुई मोगरा मालती चाफा बकुळी सुगंधी शेवंती
दवणा मरवा तुळस वैजयंती गुंफूनि हार करणार
आजी गिरीधर मी पुजणार "
हे श्लोक लहानपणापासूनच मनात रुंजी घालत होते. मोठा झाल्यावर बागकामाची आवड निर्माण झाली मालती लाडक्या शंकराची पूजा मी करावी असे वाटत होते. पण मालती कुठे मिळेल हा प्रश्न आला. त्याचा शोध कित्येक वर्षे चालू होताच.
शेवटी अडीच वर्षांपूर्वी बदलापूरच्या एका नर्सरी मध्ये हे झाड माझ्या एका मित्राने घेतले अन ते त्याच्या कडे एक ते दीड वर्ष कुंडीत होते. पण फुले नाही की नीटशी वाढही नाही. एकदा सहज त्याचा फोन आला "अरे मालती नावाचे झाड आहे माझ्याकडे तुला हवे का हे कारण मी ते फेकून देणार आहे. माझ्याकडे काही फुले येत नाहीत". त्याचा फोन झाल्यावर लगेच म्हणालो अरे हे तर झाड मी गेल्या कित्येक वर्षांपासून शोधत आहे. आणि काय गम्मत बघा १५ दिवसात ते झाड माझ्या घरी विराजमान झाले. मी पण लगेच त्याची कुंडी न बदलता त्याला फक्त छाटले आणि तसेच ठेवून दिले. मग काय मजा सांगू !! या मालतीला चांगली निगा, झक्कास ऊन आणि वेळेवर पाणी यांच्या संगमामुळे महिन्या भरातच हिने बहर दाखवला आणि एक दोन नाही तर तब्ब्ल शे दोनशे फुले या ३-४ महिन्यांमध्ये येऊन गेली. गणपती, गोकुळाष्टमी या सणांच्या वेळेस माझ्या देवांची खरोखर मौज झाली खरी.
इतके वाचल्यावर तुम्हाला उत्सुकता लागली असेलच की खर्च असे कोणते झाड आहे हे? चला तर मग आपण या मालतीची ओळख करून घेऊ.
मालती हे एक वेलवर्गीय झुडूप असून त्याला मराठी मध्ये मालती, कन्नड मध्ये मालतीलता, तेलगू मध्ये पालमल्ले आणि इंग्रजी मध्ये clove jasmine किंवा clove scented echites असे म्हटले जाते. शास्त्रीय नाव Aganosma heynei किंवा Echites diachotomus असे आहे. मालती हे पूर्णपणे भारतीय झाड असून जाड बुंधा असलेली वेल वर्गीय वनस्पती आहे. काहीशी अंडाकृती आणि टोक असलेली पाने जी एकमेकांसमोर असतात. याची पाने थोडीशी चकचकीत असतात. याची फुले पाच पाकळ्या असलेली आणि काहीसा लवंगे सारखा सुवास असलेली असतात. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करेन, मालती आणि मधुमालती
या झाडाचे एक महत्व म्हणजे गणेश चतुर्थीच्या प्रतिष्ठापना पूजेवेळेस जी पत्री लागते त्या २१ पत्रींमध्ये मालतीचा समावेश आहे. तसेच गणपतीच्या २१ पुष्प पूजेच्या वेळेस मालतीची २१ फुले "ओम सर्वात्मकाय नमः: मालती पुष्पम समर्पयामि ।" असे म्हणून वाहिली जातात. विष्णूपूजेमध्ये देखील या झाडाच्या फुलांचा समावेश होतो.
कशा प्रकारे या झाडाची जोपासना कुंडी मध्ये करता येते ते आता पाहूया.
कसे लावाल
आठ ते २० इंचाच्या कुंडीमध्ये मालती सहज लावता येते. यास काळी किंवा लाल वाळूमिश्रित माती खूप गरजेची असते. झाड लावताना कुंडीला ५ ते ६ छिद्रे पाडून घ्या. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पहिले त्या कुंडीमध्ये खडीचा एक थर पसरा. नंतर शेणखत, गांडूळ खत, नदीतील बारीक वाळू निंबोळी पेंड यांचे मिश्रण बनवून घ्या. थोडा थर मग पसरा. नंतर रोपवाटिकेतून आणलेल्या रोपाची प्लॅस्टिक पिशवी काढून मातीसकट ते रोप कुंडीमध्ये ठेवा. नंतर वरील मिश्रणाने कुंडी भरून घ्या.
कुंडीचे पुनर्भरण
दर वर्षी पावसाळ्यापूर्वी कुंडीतील माती, नदीतील वाळू बदलणे गरजेचे आहे. हे करताना छोटी मुळे कापून टाकल्यास त्याच कुंडीमध्ये झाड लावता येते. नंतर कंपोस्ट, शेणखत घातल्यास छान फुले येतात. या झाडाचे बोन्साय देखील करता येते. पण जमिनीत लावल्यास उत्तम.
सूर्यप्रकाश
मालतीच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाशाची गरज असते. या झाडाला कमीतकमी ४ ते ८ तास कडक उन्हाची गरज असते. चार तासापेक्षा कमी सूर्यप्रकाश असेल तर फुले येणारच नाहीत किंवा कमी येतील. आधीच्या लेखात सांगितल्या प्रमाणे जास्त सूर्यप्रकाश तर जास्त फुले हे लक्षात असू द्या.
पाणी
कुंडीत पाणी जास्त झाले तर याची मुळे सडतात आणि झाड दगावते. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे पाण्याचा निचरा करणारी माती गरजेची असते. झाड कुंडीत असल्याने रोज पाणी द्यावे पण माती ओलसर असल्यास पाणी घालणे टाळावे.
खते
मालतीचे झाड वाढविण्यास थोडे अवघड आहे. भरपूर शेणखत आणि गांडूळ खत टाकल्यास भरपूर फुले येतील. आणि तरीदेखील फुले येत नसल्यास पोटॅशयुक्त खतांचा वापर करू शकता किंवा कांद्याचे पाणी आणि केळ्याच्या वाळलेल्या सालीचे खत वापरू शकता. हे करून देखील फुले येत नसल्यास कॅल्शियमचा पुरवठा करणारे बोनमिल वापरावे, उत्तम परिणाम दिसेल.
किडींचा प्रादुर्भाव
या झाडाला किडींचा प्रादुर्भाव अगदी कमी प्रमाणात होतो. फक्त नियमित पणे झाड पाण्याने धुतल्यास किडीचा प्रादुर्भाव होणार नाही आणि झाड देखील टवटवीत राहील.
नवीन रोप तयार करणे
फांदी पासून लेयरिंग पद्धतीने किंवा फांदीच्या कटिंग पासून किंवा बियांपासून नवीन रोप तयार करता येऊ शकते. बीज रुजायला साधारण १५ ते २० दिवस जातात. फांदीपासून लावल्यास १ महिन्यामध्ये नवीन रोप तयार होते.मालतीची फांदी पाण्यात ठेवल्यास ७ दिवसात टोकाला पांढरे दाणे दिसू लागतील त्यानंतर कोकोपीट आणि वाळू मिश्रित माती मध्ये ती फांदी लावल्यास नवीन रोप तयार होईल.
महत्वाच्या टिप्स
हे झाड फार लवकर वाढते त्यामुळे सुरुवातीस लावताना मोठ्या कुंडीत लावणे गरजेचे आहे
वेळोवेळी कुंडीचे पुनर्भरण करावे आणि ते करताना मुळे छाटावीत म्हणजे छोट्या कुंडीत छान झाड तयार होईल
शेणखत आणि गांडूळ खत यांचा योग्य वापर केल्याने झाडाची वाढ छान होते
केळ्याच्या सालीचे तुकडे वाळवून त्याची पूड करून टाकल्यास झाडास लवकर फुले लागतात
अशा या सुंदर वृक्षाची फुले विशेषतः सायंकाळी फुलत असल्याने संध्याकाळ सुगंधित आणि मंगल वाटते आणि आपले मन कसे उल्हसित व प्रसन्न होते.
मित्रहो तुम्हाला माझे लेख तर आवडत असल्याची पोच पावती तुम्ही देत आहातच. असाच लोभ असू द्या हि नम्र विनंती !!
Comments